मावळमधून आबांची कन्या – स्मिता पाटील निवडणूक लढवणार ?

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन – दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मावळमधून पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर आता स्मिता पाटील यांना मावळमधून लढण्यासाठी काँग्रेसकडून आग्रह होत आहे.

मावळमध्ये तगडा उमेदवार देण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले होते. कारण मावळमध्ये तगडा उमेदवार दिला नाही तर ही जागा जिंकली जाऊ शकत नसल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. पार्थ पवार यांचे समोर आल्यानंतर पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात आपले कामही सुरु केले होते. परंतु एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात नको असे शरद पवार यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी पार्थ पवार यांच्या नावावर फूली मारली.

शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या नावावर फूली मारल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणले आहे. पक्षाच्या नेत्यांनीही यासंदर्भात स्मिता पाटील यांच्याशी प्राथमिक बोलणी केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्मिता पाटील यांच्या होकाराच्या प्रतिक्षेत आहे.

मावळ मतदारसंघात येणाऱ्या पनवेल आणि त्या लगतच्या परिसरात आर आर पाटील यांनी घेतलेल्या डान्स बार बंदीच्या निर्णयामुळे त्या भागात आर आर पाटील यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. राज्यात सर्वात जास्त डान्स बार या भागात होते त्यामुळे तेथील डान्स बार बंद झाल्याने तरुण पिढी उध्वस्त होण्यापासून वाचली. पुढे स्मिता पाटील यांनीही या निर्णयाचा पाठपुरावा सुरुच ठेवला होता. त्यामुळे या भागात सहानुभूतीचे वातावरण दिसत आहे. मावळ, पिंपरी चिंचवड या भागातही आर. आर. पाटील यांच्यामुळे स्मिता यांच्याबद्दल सहानुभूती असून त्याचा फायदा या मतदारसंघात होऊ शकतो असा पक्षाला अंदाज आहे.