प्रियंका गांधी नवऱ्याचे कमी माझे नाव जास्त घेतात : स्मृती इराणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यात देशातल्या ७ राज्यांमधल्या ५१ मतदार संघाचा समावेश आहे. आज काटे की टक्कर असणाऱ्या अमेठी मतदार संघात देखील मतदान होत आहे. या मतदार संघात भाजपकडून स्मृती इरानी तर काँग्रेसकडून राहुल गांधी निवडणुकीच्या मैदानात आहेत. स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

प्रियांका नवऱ्याचे कमी माझे नाव जास्त घेतात
‘पाच वर्षांपूर्वी प्रियांका गांधी- वधेरा यांना माझे नावही माहित नव्हते. पण सध्या त्या सतत माझे नाव घेत असतात. नवऱ्याचे नाव कमी आणि माझे नाव जास्त उच्चारत असतात’, असा घणाघाती आरोप भाजपच्‍या केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी यांनी काँग्रेसच्‍या सरचटणीस प्रियांका गांधी -वधेरा यांच्‍यावर केला आहे.

गांधी परिवार स्मृती इराणींच्या निशाण्यावर
याबरोबरच स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील टीकेचे लक्ष्य केले आहे. ‘एका व्‍यक्‍तीचा मृत्‍यू हॉस्‍पिटलमध्‍ये झाला कारण त्‍या हॉस्‍पिटलचे ट्रस्‍टी राहुल गांधी आहेत. तसेच त्‍या व्‍यक्‍तीजवळ आयुष्‍यमान कार्ड होते. गांधी परिवार राजकाराणासाठी एकाद्‍या निर्दोष व्‍यक्‍तीचा जीव घेण्‍यासही मागेपुढे पाहणार नाही, ऐवढे त्‍यांना राजकारण प्रिय आहे. असा गंभीर आरोप स्‍मृती इराणी यांनी गांधी परिवारावर केला आहे.

काय आहे संजय गांधी हॉस्पिटल प्रकरण ?
रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी येथील संजय गांधी हॉस्पिटलच्या संदर्भात दोन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यामधून त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर आरोप केले होते. २६ एप्रिल रोजी उपचार करवून घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

एका निर्दोष व्‍यक्‍तीला का मारले ?
याबाबत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट केले होते की, “आज माझ्‍याकडे शब्‍द नाहीत, कोण एवढ्‍या खालच्‍या पातळीला जावू शकते, ऐवढा विचार देखील मी केला नव्‍हता. एका गरीब व्‍यक्‍तीला केवळ यासाठी मरणाच्‍या अवस्‍थेत सोडून दिले कारण त्‍याच्‍याकडे मोदी सरकारचे आयुष्‍यमान कार्ड होते. तसेच हॉस्‍पिटल देखील राहुल गांधी यांचे होते. यासंबंधीच्‍या दुसर्‍या टि्वटमध्‍ये लिहिले आहे की, ‘संजय गांधी हॉस्‍पिटलचे ट्रस्‍टी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वधेरा अमेठीच्‍या जनतेस उत्तर द्‍या…एका निर्दोष व्‍यक्‍तीला का मारले?’