अमेठीत ‘हरवलेल्या खासदारांना प्रश्न’, उत्तरात ‘स्मृती इराणीं’नी विचारलं – ‘सोनिया गांधीं’नी त्यांच्या क्षेत्रासाठी किती वेळा प्रयत्न केले हे सांगावं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी पुन्हा एकदा अमेठीचे राजकारण तापले. केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्याविरोधात येथे पोस्टरबाजी करण्यात आली. भिंतींवर चिकटवलेल्या पोस्टर्समध्ये हरवलेले खासदार असे लिहिण्यात आले असून पोस्टर्सच्या माध्यमातून प्रश्नही विचारले गेले होते. मात्र, संध्याकाळपर्यंत स्मृती इराणी यांनी स्वत: पोस्टरची दखल घेत स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी त्यांनी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षांवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले. दरम्यान सोमवारी जिल्ह्यातील जामोच्या अतरौली, शाहगड ब्लॉकच्या बहोरखा प्राथमिक शाळा आणि आसपासच्या खांबांवर केंद्रीय मंत्री आणि अमेठी खासदार स्मृती इराणी यांच्याविरोधात भिंतींवर पोस्टर लावण्यात आले आहेत. हरवलेल्या खासदारांना प्रश्न असे या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आले आहे.

पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की, ‘अमेठीमधून खासदार झाल्यानंतर (वर्षभरातून 2 दिवस) फक्त काही तास आपली उपस्थिती नोंदविणाऱ्या अमेठीच्या खासदार स्मृती इराणी, आज कोरोना साथीच्या आजाराने समस्त जनता भयभीत आणि त्रस्त झाली आहे. आम्ही असे म्हणत नाही की आपण हरवले आहात. आम्ही एका ट्विटद्वारे आपल्याला अंताक्षरी खेळताना पाहिले आहे. आम्ही तुमच्यामार्फत एका व्यक्तीला भोजन देताना पाहिले आहे, पण आज अमेठी खासदार म्हणून अमेठीचे निरागस लोक या वेळी तुम्हाला त्यांच्या गरजा व अडचणींसाठी शोधत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांच्या त्रासादरम्यान अमेठीच्या लोकांना निराधार सोडल्याचा अर्थ असा होतो की अमेठी आपल्यासाठी फक्त एक टूर हब आहे. तुम्ही काय आता अमेठीला फक्त खांदा देण्यासाठी येणार का ?’

एवढेच नव्हे तर काँग्रेसकडून या पोस्टरला मोठ्या प्रमाणात ट्विट करण्यात आले होते. कॉंग्रेसचे एमएलसी दीपक सिंह पासून ते उत्तर प्रदेश कॉंग्रेस आणि अखिल भारतीय महिला कॉंग्रेसने या पोस्टरला ट्विट केले. त्याचवेळी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या ट्विटला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी लिहिले की, ‘अमेठी, सुलतानपूर आणि रायबरेली जिल्हाधिकारी यांच्याशी सतत संपर्क आणि समन्वयाच्या माध्यमातून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ अमेठीच्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. सोनिया गांधींनी स्वत: त्यांच्या क्षेत्रासाठी किती वेळा प्रयत्न केले हे सांगावे ?