राहुल गांधींच्या पराभवासाठी केला होता ‘नवस’ ; 14 कि.मी. पायी चालुन स्मृती इराणी पोहचल्या सिध्दीविनायकच्या ‘चरणी’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तब्बल ३५४ जागा जिंकत इतिहास रचला आहे. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. मोठ्या राजकीय नेत्यांना पराभवाला सामोरे जायला लागले.

यात उत्तर प्रदेशमधील गांधी घराण्याच्या पारंपारिक मतदारसंघाला सुरुंग लावून भाजपच्या उमेदवार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विजयाची पताका फडकावली. या मतदारसंघात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी त्या पायी मंदिरात पोहोचल्या. याविषयीचा स्मृती इराणी यांची मैत्रिण आणि निर्माती एकता कपूर यांनी स्मृती इराणी यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून याची माहिती दिली आहे.

’१४ किलोमीटर चालत जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतरचा टवटवीतपणा’, असे कॅप्शन एकता कपूर यांनी या फोटोला दिले आहे. त्यात या दोघी सेल्फी घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर एकता कपूर यांनी इंस्टग्रामवर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात स्मृती इराणी बोलत आहेत. यात तेव्हा त्या ‘देवाने माझा नवस पूर्ण केला’, असे बोलतात.

यावेळी इराणींनी नेमका कोणता नवस केला होता हे सांगितले नाही. परंतु अमेठीमध्ये राहुल गांधी यांच्या पराभवासाठी स्मृती इराणी यांनी सिद्धिविनायकाला नवस केला होता आणि तो पूर्ण केल्याची चर्चा सध्या रंगत आहे.दरम्यान, राहुल गांधी यांचा पराभव केल्यानंतर स्म्रूत्यू इराणी पहिल्यांदा मुंबईत आल्या होत्या. अमेठीतून तीन वेळा निवडून आलेल्या राहुल गांधी यांच्याविरोधात त्यांनी विजय मिळवून इतिहास घडवला होता.