दिलासादायक ! सर्पदंशावर आता लवकरच ‘टॅबलेट’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील विविध राज्यांमध्ये सर्पदंशाने मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेकांना योग्य प्रथमोपचार न मिळाल्याने त्यांचा जीव गेल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी साडेचार ते साडेपाच दशलक्ष लोकांना सर्पदंश होतो. मात्र आता सर्पदंश झालेल्या व्यक्तींना वाचवता येेणे शक्य होणार आहे. साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ देता येऊ शकेल असे औषध टॅबलेटच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी औषध शोधून काढले आहे.

शास्त्रज्ञांनी औषधामध्ये डाइमेर्काप्रॉल आणि डीपीएमएस या घटकांचा वापर केला आहे. दोन्ही घटक सापाच्या विषाचा परिणाम कमी करतात. सर्वाधिक विषारी समजल्या जाणार्‍या वायपर सापाच्या विषावर शास्त्रज्ञांनी अभ्यास करून पाहिला. या औषधाचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी ठरला आहे. हे औषध विषाचा प्रभाव कमी करत असल्याचे दिसून आले आहे. सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

औषध टॅबलेटच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे, जे तोंडावाटे घेता येणार आहे. सामान्यपणे सर्पदंशावरील औषध इंजेक्शनमार्फत दिले जाते. मात्र हे औषध टॅबलेट स्वरूपात उपलब्ध होणार आहे. मात्र आतापर्यंत इंजेक्शनमार्फत दिल्या जाणार्‍या औषधाला हे टॅबलेट स्वरूपातील औषध पर्याय नाही, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. हे औषध सर्पदंशावरील प्राथमिक उपचार म्हणून वापरता येऊ शकते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पुढील उपचार मिळेपर्यंत हे औषध त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यास मदत करणार आहे.