देशातील पहिल्या महिला सर्पमित्र आता टपाल तिकीटावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातल्या पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांना आता केंद्रीय डाक विभागाने त्यांच्या निस्वार्थ सर्प सेवा आणि जनजागरण कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या छायाचित्रासह टपाल तिकीट जारी केले आहे. मागील ३५ वर्षांपासून तब्बल ५१,००० पेक्षा जास्त विषारी आणि बिनविषारी साप नागरी परिसरातून पकडून वनविभागामध्ये नोंदणीकृत करून जंगलात सोडल्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे आहे. त्या मूळच्या बुलढाणा इथल्या आहेत.

के.ऐ.एफ. पुरस्कार जाहीर

त्यांच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील बोथा नावाच्या छोट्याशा गावी झाली होती. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकर्‍यांची कन्या असलेल्या वनिता बोराडे यांनी आशिया खंडातील प्रथम महिला सर्पतज्ञ व हिंदुस्थानाची प्रथम महिला सर्पमित्र होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

त्यांचा गौरव करण्यासाठी बॉलीवुडचा अतिशय प्रतिष्ठेचा के.ऐ.एफ. पुरस्कार सर्पमित्र वनिता बोराडे यांना जाहीर केल्याची घोषणा प्रख्यात सिने दिग्दर्शक तथा बॉलीवुडचे अध्यक्ष रविंद्र अरोरा यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली लवकरच हा पुरस्कार सर्पमित्र वनिता बोराडे यांना समारंभ पूर्वक प्रदान केल्या जाणार आहे.

आता भारत सरकारच्या डाक विभागाने टपाल टिकिट जारी केल्याने त्यांच्या कार्याची दखल भारतासह संपूर्ण जगाने घेतली आहे. सदर टपाल टिकीट लंडन येथे होणार्‍या अंतरराष्ट्रीय टपाल टिकिट प्रदर्शनात आपल्या भारत सरकार तर्फे ठेवल्या जाणार आहे. आज रोजी हे टपाल टिकिट आपल्या देशातील सर्व जिल्हा पोस्ट ऑफिसमध्ये व पोस्टल म्यूजियम मधे भारत सरकारच्या डाक विभागाने उपलब्ध केले आहे. या अभिनंदनीय कार्याचे कौतुक समाजातील सर्व स्तरातून होत आहे.