Mumbai News ! सापाच्या डोक्यात घातला वापरलेला ‘कंडोम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास मुंबईत कांदिवली पूर्वेला ग्रीन मीडोस हाऊसिंग सोसायटी जवळ हा साप आढळला. श्वासोश्वास करण्यासाठी त्या सापाची धडपड सुरु होती. कारण, अज्ञात व्यक्तीने या सापाच्या डोक्यात वापरलेला कंडोम घातला होता. त्या अवस्थेतून सापाची सुटका केल्यानंतर लगेच त्याला पशूवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले.

यावेळी एका स्थानिक रहिवाशाने मदतीसाठी मिता मालवणकर या महिला सर्पमित्राला घटनास्थळी बोलवले. मिता लगेच त्या ठिकाणी पोहोचल्या. यावेळी त्या म्हणाल्या, “स्थानिक रहिवाशी वैशाली तानहा यांचा मला फोन आला. एक साप विचित्र पद्धतीने सरपटत असून त्याच्या डोक्याभोवती प्लास्टिक बॅग गुंडाळलेली असल्याचे त्यांनी सांगितले. मी तिथे पोहोचले, तेव्हा समोरचे दुश्य पाहून मला धक्का बसला. कारण कोणीतरी घाणेरडा, वापरलेला कंडोम सापाच्या चेहऱ्याभोवती गुंडाळलेला होता” दरम्यान, मिता यांनी पद्धतशीरपणे त्या अवस्थेतून सापाची सुटका केली. सर्प पकडण्यामध्ये प्रशिक्षित असलेल्या व्यक्तीने किंवा तज्ज्ञाने हे क्रूर कृत्य केल्याचा संशय मिता त्यांनी व्यक्त केला. कारण, सापाच्या चेहऱ्याभोवती कंडोम गुंडाळणे इतके सोपे नाही. त्यांचा दंश खूप वेदनादायी ठरु शकतो.

सापाची सुटका केल्यानंतर, मिता त्या सापाला बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये घेऊन गेल्या. तिथे डॉ. शैलेश पेठे या पशूवैद्यकीय अधिकाऱ्याने सापाची तपासणी केली. उपचारानंतर त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी पुन्हा सोडून देण्यात आले.