AAP च्या नेत्याच्या पत्नीने मुलांसह राष्ट्रपतींकडे मागितले इच्छामरण, जाणून घ्या कारण

सिरसा : पोलीसनामा ऑनलाईन –   आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्याच्या पत्नीने आपल्याला आपल्या अल्पवयीन मुलांसह इच्छामरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील AAP चे अध्यक्ष हंसराज सामा यांची पत्नी बिमला देवी यांनी उपायुक्तांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सिरसा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

पोलिसांवर आरोप करताना बिमला देवी म्हणाल्या की, पोलिसांनी त्यांचे पती हंसराज सामा, दोन मुलगे आणि सुना यांना कलम 326 अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय आणि निष्पक्ष पद्धतीने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या 28 नोव्हेंबर रोजी कंगनपूर रोज जवळील एफसीआयच्या गोदामात त्यांचे आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या भांडणात कुणालाही दुखापत झाली नव्हती. मात्र असे असूनही पोलिसांनी मेडिकल रिपोर्टच्या आधारावर हंसराज सामा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बिमला देवी यांनी सांगितले की, भांडणावेळी तिथे आजूबाजूला अनेकजण उपस्थित होते. त्यांनीसुद्धा लिखित शपथपत्र देऊन कुठल्याही शेजाऱ्याला दुखापत झाली नसल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणी निष्पक्षपणे तपास करावा, किंवा आपल्याला आपल्या अल्पवयीन मुलांसह इच्छा मरण द्यावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतीकडे केली आहे.