… म्हणून ED कार्यालयात हजर राहू शकलो नाही, खडसेंनी पत्राद्वारे दिले स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनासदृश्य लक्षण दिसत असल्याने आपण सध्या ED कार्यालयात चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. या संदर्भात खडसे यांनी एक पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे.

भोसरीतील भूखंड प्रकरणात ED कडून शनिवारी आपल्याला नोटीस प्राप्त झाली आहे. 30 डिसेंबरला मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार होते. मात्र, कोरोनाची लक्षण दिसत असल्याने आपण हजर राहू शकलो नाही, असे ते म्हणाले. वास्तविक भोसरीतील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे खडसेंनी सांगितले होते.

दरम्यान, ED कार्यालयात आज उपस्थित होणार होतो, पण कोरोनासदृश्य लक्षण असल्याने मी 14 दिवसांनंतर ईडी कार्यालयात हजर होणार आहे, असे असे ईडी कार्यालयास कळवले होते. संबंधित कार्यालयानेही यास संमती दिली आहे. त्यामुळे, 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर मी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीसाठी सहकार्य करेन, असे स्पष्टीकरण खडसेंनी एका पत्राद्वारे प्रसिद्ध केले आहे.

खडसेंना 28 डिसेंबरपासून सर्दी, ताप व कोरड्या खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे, त्यांनी तपासणी केली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. म्हणून, ईडीच्या आजच्या चौकशीला न जाण्याचे खडसेंनी सांगितले.