Coronavirus : राज्यात आतापर्यंत COVID-19 मुळे 42 पोलिसांचा मृत्यू, 2248 जण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे संक्रमित झालेल्या पोलीसांची संख्या 3661 एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 42 झाली आहे. मंगळवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत 2248 पोलीस कर्मचारी कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र पोलीस दलातील 3661 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

ते म्हणाले की, आतापर्यंत 6 लाख 17 हजार 242 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी 730 जण क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. त्यांनी सांगतिले की, राज्य सरकार 134 मदत केंद्र चालवित असून या ठिकाणी 4437 स्थलांतरित मजुरांना निवारा देण्यात आला आहे. तसेच त्यांना अन्न व इतर वस्तू पुरविण्यात येत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भादवी कलम 188 अंतर्गत 1 लाख 30 हजार 396 प्रकरणे नोंदवण्यात आले आहेत.

यामध्ये 26 हजार 887 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 82 हजार 344 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 7.65 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.