याआतापर्यंत तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा ‘लाभ’

पोलिसनामा ऑनलाईन – गोरगरीब लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारने ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. 26 जानेवारीपासून आतापर्यंत 1 कोटी 870 थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. या योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विविध जिल्ह्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 848 केंद्रे कार्यरत आहेत. योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यास सुरूवात झाली आहे. जानेवारी महिन्यात 79 हजार 918, फेब्रुवारी महिन्यात 4 लाख 67 हजार 869, मार्च महिन्यात 5 लाख 78 हजार 031, एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040 आणि जुन महिन्यात 29 जून पर्यंत 29 लाख 91 हजार 755 शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आली आहेत. अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केले आहे.शिवभोजन केंद्र चालकांनादेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचार्‍यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.