तंत्रनिकेतन प्रवेशासाठी राज्यभरात आतापर्यंत 5 हजार जणांचीच नोंदणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने 10 ऑगस्टपासून तंत्रिनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यात तंत्रनिकेतनच्या 1 लाख 17 हजार 824 जागा उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यात केवळ 5 हजार 878 विद्यार्त्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले असल्याचे समोर आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घातला. त्यामुळे विद्यार्थ्याना घरूनच अर्ज भरता येणे शक्य आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना कागदपत्रे डाऊनलोड करावी लागणार आहेत. यानंतर विभागांकडून विद्यार्थ्यांकडून ई-मेलच्या माध्यामातून आलेले अर्ज आणि कादपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल व लॅपटॉप नाही त्यांना ऑनलाईन पद्धतीने विशिष्ट वेळेत बोलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्याना क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येणार आहे. 10 ऑगस्टपासून सुरु झालेली नोंदणी 25 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. गेल्या वर्षी राज्यातील निम्या जागा रिक्त राहिल्या होत्या.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

अर्ज नोंदणी – 10 ते 25 ऑगस्ट
कागदपत्रांची पडताळणी – 15 ते 25 ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे – 28 ऑगस्ट
अपेक्षा नोंदवणे -29 ते 31 ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी – 2 सप्टेंबर