… म्हणून गॅस सिलेंडरचे अनुदान जमा होत नाही !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  – केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलेंडरचे (Gas Cylinder) दर जाहीर करण्यात येतात. त्याप्रमाणे गॅसचे दर ( Gas Price) प्रत्येक महिन्याला बदलत असत. ८०० रुपयांच्या गॅस सिलेंडरचे साधारण २०० रुपये ग्राहकांच्या बँक खात्यात ( Bank Account) जमा होत होते. यानंतर केंद्र सरकारकडून गॅसची आधारभूत किंमत ५९७ रुपयांपर्यंत आणली आणि त्यानंतर गॅसच्या किमतीत कसलाच बदल केला नाही.

आता अनुदानित आणि विना अनुदानित स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) (LPG) किमती सारख्या झाल्याने, गॅस सिलिडरचे अनुदान जमा होत नसल्याचा दावा गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुस्ती गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि खुल्या बाजारातील गॅसचा दर वाढल्यास पुन्हा अनुदान जमा होईल. अनुदानित सिलिंडर आणि विना अनुदानित सिलेंडर यामधली तफावत कमी होऊन ती आता २० रुपयांवर आली आहे. त्यामुळे गॅस अनुदान बँकमध्ये जमा होत नसल्याचे गॅस वितरक संघटनेच्या सदस्यांकडून सांगण्यात आले आहे.

इंडियन ऑईलच्या ( Indian Oil) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय इंधन दर, आयात आणि देशातील उत्पादन अश्या विविध घटकांवर गॅसच्या किमती अवलंबून असतात. त्यानुसार गॅसचा दर ठरत असतो. एलपीजीचे (LPG) देशातील उत्पादन वाढले असून आयाती मध्येही वाढ झाली आहे. पूर्वी खुल्या बाजारात एलपीजी गॅसचा दर ७०० रुपये होता तर अनुदानित सिलिंडर ५६० रुपयांना मिळत होता. आता बाजारभाव आणि अनुदानित सिलिंडरच्या भावातील तफावत कमी झाली आहे. त्यामुळे हे अनुदान जमा होत नाही जर ह्या तफावतीमध्ये वाढ झाली तर पुन्हा अनुदान सुरु करण्यात येईल.