… म्हणून भाजपच्या महिला उमेदवाराचा केला ‘आयटम’ असा उल्लेख, कमलनाथांनी आता केली सारवासारव

भोपाळ : वृत्तसंस्था –   मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि पोटनिवडणुकीतील उमेदवार इमरती देवी यांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयटम असा उल्लेख केला. यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. कमलनाथ यांच्या विधानावरुन संपर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं.1. विधानसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते आयटम नं.1. आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरलेला नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवलं नाही. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत.

ते पुढे म्हणले की, आयटम या शब्दाचा वापर सर्वसामन्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. जर तुम्ही कुठला कार्यक्रम पाहत असाल तर त्यातही आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे, असा उल्लेख असतो. मग हे काय अपमान करणारे आहे का. मला असं वाटत नाही. मात्र, त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सारे काही सुरु आहे. तेच त्यांचे लक्ष्य आहे. आता त्यांनी जनतेसमोर जावं आणि आपल्या पंधरा वर्षांचा आणि सात महिन्याचा हिशोब द्यावा असे आव्हानही कमलनाथ यांनी यावेळी भाजपला दिले आहे.

सौदेबाजी करुन सरकार स्थापन

सौदेबाजी करुन आणि बोली लावून यांनी सरकार स्थापन केले आहे. हे लोक मध्य प्रदेशच्या जनतेला मूर्ख समजतात . जर मी कोक प्यायचं बंद केलं तर जनतेला रोजगार मिळणार आहे का, त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवराज सिंह चांगले अभिनेते

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे चांगले अभिनेते आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन अभिनय केला पाहिजे आणि मध्य प्रदेशचं नाव पुढे आणलं पाहिजे. त्यांनी अनेक वर्षे असाच अभिनय केलाय. आता जनतेला तो समजू लागला आहे, असेही कमलनाथ यांनी म्हटले आहे.