तर, शिवसेनेचे हाताच्या बोटांपेक्षा कमी खासदार

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईन

२०१४ मध्ये मोदी लाटेबरोबर युती असल्याने शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले़ आता मोदी लाटेचा प्रभाव नसल्याने काही प्रमाणात नुकसान होईल़ हे नुकसान सिमित ठेवायचे असेल तर, भाजपशी युती आवश्यक आहे़ युती न केल्यास एका हाताच्या बोटांऐवढे शिवसेनेचे खासदार निवडून येण्याची शक्यता असल्याचे भाकीत शिवसेनेच्या विद्यमान खासदारांकडून केले जात आहे़

शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी भाजपबरोबर युती न करण्याचा आणि पुढील निवडणुका स्वतंत्र लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे़ हा निर्णय जाहीर केल्यापासून शिवसेनेत जनतेतून निवडून आलेले आणि पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभा किंवा विधान परिषदेत खासदार, आमदार झालेले असे सरळ सरळ दोन गट पडले आहेत़

विद्यमान खासदारांपैकी जवळजवळ सर्व खासदारांना शिवसेनेकडून पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या खासदारांना आतापासूनच २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेध लागले आहेत़ मोदी लाट आणि युतीमुळे मागील वेळी ते सहजपणे निवडून आले होते़ शिवसेनेच्या सरकारात असूनही विरोधक अशा भूमिकेमुळे हे खासदार कात्रीत सापडले आहेत़

मोदी लाट नसल्याने आता काही प्रमाणात नुकसान होईल़ हे नुकसान कमीतकमी ठेवायचे असेल तर, युती शिवाय पर्याय नाही़ युती केली नाही तर शिवसेनेच्या खासदारांची संख्या पाच ते सहा पर्यंत खाली येण्याची शक्यता एका खासदाराने व्यक्त केली आहे़ त्यामुळेच विद्यमान खासदारांकडून युतीसाठी ठाकरे यांना गळ घातली जात आहे़ त्यासाठी आता पालघरचे नव्याने उदाहरण दिले जात आहे़ पालघरमध्ये शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावूनही श्रीनिवास वनगा यांना भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे शिवसेनेने वास्तव स्वीकारले पाहिजे. युती तोडल्यास भाजपाचे नुकसान होईल, पण त्यामध्ये शिवसेनेचा फायदा काय?, असा सवाल विद्यमान खासदार विचारत आहेत़ तसेच २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व वाढेल व पक्षाला महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतील, असा मतप्रवाह अनेक खासदारांमध्ये आहे.

त्याचवेळी संजय राऊत यांच्यासारखे नेते भाजपाविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून युती तोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याला भाजपासोबत युती नको आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर तर शिवसैनिकांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. याठिकाणी पहिल्यात प्रयत्नात शिवसेनेने तब्बल अडीच लाख मते मिळवली. हे खूप मोठे यश आहे. आजपर्यंत झालेल्या पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये कोणत्याही नेत्याने भाजपाशी युती करा, असा आग्रह धरला नसल्याचा दावा संजय राऊत यांनी नुकताच केला होता. पक्षातील नेत्यांच्या या भूमिकांमुळे सध्या उद्धव ठाकरेंसमोर पेच उभा राहिला आहे.
त्याचबरोबर सरकारमध्ये असूनही शिवसेनेच्या मंत्र्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही़ सत्ताधारी म्हणण्यापेक्षा विरोधक म्हणूनच शिवसेनेची प्रतिमा लोकांसमोर आली आहे़ सरकारमधून बाहेर पडल्यास लोकांची काय प्रतिक्रिया असेल, याचा अंदाज शिवसेनेला येत नाही़

तसेच जर युती तोडली तर अन्य पक्षांप्रमाणे आता भाजप शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना आपल्या पक्षात घेतील, याची भितीही शिवसेनेला आहे़ त्यामुळे युतीबाबत कोणताच निर्णय पक्षअध्यक्ष येऊ शकत नाही, असे समजते़