23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार जवळपास ‘निश्चित’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशन हे ठाकरे सरकारने सहा मंत्र्यांच्या विस्ताराने पार करण्याचा निर्णय घेतला आणि आता बाकी मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. याबाबत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या २३ डिसेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी अशा व्यक्त केली आहे.

नागपूरच्या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. २१ तारखेला अधिवेशन संपत आहे. २२ ला सुट्टी आहे. त्यामुळे २३ तारखेला मुख्यमंत्र्यांनी संपत्ती दिली तर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती अजित पवार यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी पवार साहेबानी याबाबत एक बैठक घेतली होती आणि अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे देखील सांगितले असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

कर्ज माफी संधर्भात काल बैठक होणार होती परंतु होऊ शकली नाही, त्यामुळे आज शरद पवार मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत आणि मग कामानिमित्त औरंगाबादला जाणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत काय म्हणाले अजित पवार
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी बोलताना अजित पवार यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत देखील आपले मत व्यक्त केले. हा कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती पूर्ण घेतल्याशिवाय बोलणं योग्य ठरणार नाही असे अजित पवार म्हणाले तसेच या कायद्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं आहे केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीची गरज नाही. तर दुसरीकडे राज्याच्या मंजुरीची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. अधिवेशनानंतर मुंबईला जाऊन याबाबत ऍडव्होकेट जनरलकडून पूर्ण माहिती घेऊ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/