मनसेचं थेट राज्यपालांना साकडं, म्हणाले – ‘आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला’

बारामती: पोलीसनामा ऑनलाइन – बारामती शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन येथील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.सुधीर पाटसकर यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाच बारामतीत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

याबाबत अ‍ॅड. पाटसकर यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, येथील स्थानिक प्रशासन राजकीय दबावाखाली थेट रुग्णांना इंजेक्शन देत नाही. तर स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नियमबाह्य इंजेक्शन दिली जात आहेत. तेच कार्यकर्ते त्यांच्या ओळखीच्या लोकांना ही इंजेक्शन देत आहेत. प्रशासन एका पक्षाच्या हातातील बाहुले बनल्याचे पाटसकर यांनी पत्रात नमुद केले आहे. येथील प्रशासन निर्णय घेताना कधीच विरोधी पक्षाला विचारात घेत नाही. एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकांना बोलविले जाते. अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने औषध व्यावसायिक मनमानी करत आहेत. रेमडेसिविरच्या बाबतीत सखोल ऑडिट करावे. इंजेक्शन वितरणाची जबाबदारी प्रशासनाची असतानाही ते दबावाखाली काम करत आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पाटसकर यांनी केली आहे.