‘या’ कारणामुळं उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशावेळी PM मोदी गैरहजर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले भाजपात सामील झाले आहेत. उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कराड येथील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उदयनराजेंनी सोशल मीडियावरुन भाजपा प्रवेशाबाबत जाहीर करताना माहिती दिली होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश करणार आहे. मात्र प्रत्यक्षात उदयनराजेंच्या भाजपा पक्षप्रवेशावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी नड्डा उपस्थित होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती नसल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. या विषयी स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांना कुठल्याही राजकीय पक्षप्रवेशाला उपस्थित राहता येत नाही. हा राजकीय शिष्टाचार आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला नरेंद्र मोदी आले नाहीत. मात्र, मोदी यांनी उदयनराजेंचं स्वागत केलं आहे. तसेच भेटायलाही बोलवलं आहे. 19 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी आणि उदयनराजे यांची भेट होणार आहे.

म्हणून उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला –

अवघ्या तीन महिन्यात उदयनराजेंना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावून भाजपने लोकशाहीची हत्या केली या काँग्रेसच्या आरोपाचाही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ज्यांनी लोकशाही व्यवस्थेची पायमल्ली करून देशात आणीबाणी लागू केली त्यांनी लोकशाहीचा खून झाल्याची भाषा करू नये. ज्यांनी हुकूमशाहीने सरकारे बरखास्त केली त्यांनी लोकशाहीची भाषा करू नये. अगदी छगन भुजबळांपासून नारायण राणेपर्यंतच्या नेत्यांना ज्या पद्धतीने पक्षात प्रवेश दिला, त्यांनी लोकशाहीची भाषा करू नये, असा टोलाही त्यांनी हाणला.

उदयनराजेंच्या प्रवेशाने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांचं साताऱ्यात अस्तित्व राहिल की नाही? याची धडकी त्यांच्या मनात भरली आहे. म्हणूनच ते लोकशाहीचा खून झाल्याचं सांगत आहेत, असं सांगतानाच 370 कलम रद्द करण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने निर्णय घेतल्यानेच उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like