राज ठाकरेंकडून ‘राज’ की बात ! शरद पवार आणि त्यांच्या ED च्या चौकशीचं कारण सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काहीसे शांत झाले होते. मात्र राज ठाकरेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. पुढील महिन्यात पाच तारखेला राज ठाकरे आपली पहिली प्रचारसभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीत वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी ठाकरे बोलत होते.

या मेळाव्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. मनसे आगामी विधानसभेत किती जागा लढवणार याचा खुलासा योग्य वेळी केला जाईल असे राज यांनी सांगिलते. तसेच सत्ताधारी सूडबुद्धीने राजकारण करत असल्याचा आरोपही ईडी चौकशीच्या वेळेस करण्यात आला. मात्र, राज ठाकरे याबाबत काहीही बोलले नव्हते.

आज मनसेच्या मेळाव्यादरम्यान राज यांनी ईडीच्या चौकशीबाबत खुलासा केला आहे. ”माझी आणि पवार कटुंबियांमागे ईडी चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश आहे. ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशी मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्या पक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही”, असं स्पष्टीकरण राज यांनी दिलंय.

राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळेस निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ‘ठाकरी तोफ’ धडाडणार आहे. ईडी चौकशीच्या वेळेस राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. विधानसभेचा प्रचार राज ठाकरे कशा पद्धतीने करणार आणि किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : policenama.com