‘या’ कारणामुळं आमदार निलेश लंकेंनी कोविड सेंटरला दिलं शरद पवारांचं नाव

नगर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या महामारीत अनेक लोक मदतीसाठी सरसावले आहेत. वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधेसाठी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे जवळपास अकराशे बेडचे कोव्हीड सेंटर उभारले आहे. त्यामधील १०० बेडला ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे.

आमदार निलेश लंकेने उभा केलेल्या कोव्हीड सेंटरला आरोग्य मंदिर असे नाव देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले आहे. पारनेरमधील या कोव्हीड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर हे नाव का दिलं, असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता. यावरून आमदार निलेश लंकेंनी शरद पवार यांचे नाव देण्यामागील भावना आणि प्रेरणा बोलून दाखवली आहे.

आमदार लंके सांगतात की, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा धावून कोण गेलं. १९९३ साली किल्लारीला भूकंप झाला, तेव्हा धावून कोण गेले. २ वर्षांपूर्वी सांगली आणि कोल्हापूरला महापूर आला, तेव्हाही हा ८० वर्षांचा योद्धाच धावून गेला. म्हणजे ज्यावेळेस संकट आलं तेव्हा शरद पवारच धावून गेले आहेत. आपल्याला काटा टोचला तर आपण म्हणतो, आई sss गं, आणि जर एखादा नाग दिसला तर आपण म्हणतो बाप रे, शरद पवार हे आपल्यासाठी वडिलांच्या जागी आहेत, महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा ते आधार देतात. म्हणूनच मी या कोविड सेंटरला शरद पवार यांचं नाव दिलं आहे. तसेच, हे कोव्हीड सेंटर नसून आरोग्य मंदिर आहे, असे आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, मंदिरात गेल्यावर प्रत्येकाला समाधान वाटतं, तसेच, या कोव्हीड सेंटर किंवा आरोग्य मंदिरात आल्यानंतर प्रत्येक रुग्णाला समाधान वाटलं पाहिजे, ते कोरोनाला विसरुन गेले पाहिजेत, असे त्यांनी सांगितलं आहे. या दरम्यान, उभारलेल्या रुग्णालयात प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये केला आहे. आमदार लंके यांनी फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोव्हीड सेंटर उभारलं आहे. तसेच निलेश लंके यांनी उभारलेल्या कोव्हीड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे.