…म्हणून CM ठाकरेंनी मानले 7 वर्षांची चिमुकली ‘आराध्या’चे जाहीर आभार !

पोलीसनामा ऑनलाईन :सोलापूरमधील अवघ्या 7 वर्षांच्या आराध्यानं वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान दिलं हे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार दि 4 एप्रिल 2020) रोजी तिचं जाहीर कौतुक केलं. 7 वर्षांच्या मुलीनं दाखवलेली ही समज म्हणजे कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकल्याचं द्योतक आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी सोलापूरच्या आराध्याचं कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले, “आज आराध्याचा 7 वा वाढदिवस आहे. हे वय हट्ट करण्याचं, लाड पुरवून घ्यायचं, वाढदिवस साजरा करून घ्यायचं आहे. आज तिनं सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.”

मुख्यमंत्री म्हणाले, “आज तिनं आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान दिलं आहे. हे आगळंवेगळं उदाहरण आहे. हीच महाराष्ट्राची वृत्ती, ओळख आहे. ही समज जर एका 7 वर्षांच्या मुलीमध्ये आहे तर हे युद्ध जिंकलच समजा.”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ” या युद्धात सर्वजण जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. पंतप्रधान चर्चा करत असातत. आज सोनिया गांधींनीही फोन केला होता. पवार साहेब सोबत आहेतच.” असंह ते यावेळी म्हणाले.