… म्हणून ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याची प्रशासकीय बदली, वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं ‘सत्य’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी राज्य सरकारनं 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पुण्याच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेतील एका कर्मचार्‍याची प्रशासकीय बदली करण्यात आली. त्याबाबतची वस्तूस्थिती आता समोर आली आहे. बक्कल नं. 10588 असणार्‍या कर्मचार्‍याबाबतच्या अनेक तक्रार वरिष्ठ अधिकार्‍यांकडे गेल्या होत्या. त्याबाबतची सखोल माहिती घेतल्यानंतरच संबंधित पोलिस कर्मचार्‍याची बदली करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलिस दलातील कोणत्याही पदावरील अधिकारी आणि कर्मचार्‍याची प्रशासकीय बदली करताना त्याबाबतची संपुर्ण माहिती घेतल्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याबाबत सांगण्यात आलं आहे.

कर्तव्य बजावत असताना पोलिस दलाच्या प्रतिमेला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागला नाही पाहिजे याबाबतची काळजी घेण्याची गरज असते. मात्र, काही जणांकडून तसे वर्तन होत असताना दिसत नाही. परिणामी त्यांची प्रशासकीय बदली करावी लागते. संबंधित पोलिस कर्मचार्‍याच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार झाला आहे. कर्मचार्‍याविरूध्द काही तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतरच कर्मचार्‍याच्या प्रशासकीय बदलीला मान्यता देण्यात आली असल्याचा खुलासा वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला आहे.

एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची खातरजमा करण्यात आली. काही गोष्टींमध्ये ‘कहर’ झाल्यानंतरच संबंधित कर्मचार्‍याची नेमणूक ही वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. दरम्यान, कर्मचार्‍याने केलेल्या कृत्याबाबत सखोल चौकशी देखील करण्यात येत असल्याचं वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. काही जण आपल्यावर कसा अन्याय झाला हे पटवून देण्यात ‘तरबेज’ असतात. अशावेळी प्रसारमाध्यमांनी दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं असतं अशी भावना अधिकार्‍यांनी व्यक्त केली. एखादा कर्मचारी गैरकृत्य करत असेत तसेच त्याला नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर प्रशासकीय कारवाई होणं हे क्रमप्राप्तचं असतं. त्यानुसारच संबंधित करण्याची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. दरम्यान, देशसेवा केल्याचा टेंबा मिरवून भलतेच ‘उद्योग’ करणार्‍या कर्मचार्‍याची प्रशासकीय बदली करून वरिष्ठांनी चांगलीच ‘चपराक’ दिली आहे.