‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – १ मार्च २०२१ पासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ह्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा कोरोनाची लस घेतली आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र कोरोनाची लस घेण्याचे टाळले. यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

या कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी लस घेण्याचे टाळले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस का घेतली नाही याचे कारण आता समोर आले आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशन संपल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्यात येईल. हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्याकारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेईन, असे सांगण्यात आले आहे.

सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. बुधवारी महाराष्ट्रात ९८५५ रुग्ण सापडले आहेत. तर केरळमध्ये २७०० रुग्ण सापडले आहेत. देशाच्या एकूण रुग्णसंख्येवर नजर टाकली असता ६० ते ७० टक्के रुग्ण केवळ या दोन राज्यांमध्ये आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे.