म्हणून ‘या’ आघाडीच्या नेत्यांनी दिले रिपब्लिकन पक्षातील पदाचे राजीनामे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना जागावाटपात आणि कार्यकर्त्यांना महामंडळ वाटपात भाजप-सेनेकडून डावलल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेविरोधात प्रचार करून ‘भीमशक्तीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा साठे आणि शिंदे यांनी दिला आहे. साठे आणि शिंदे यांनी याबाबत संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली आहे. सध्या रामदास आठवले आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अवहेलना होत आहे. 2014 मध्ये रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाने मोदी सरकार स्थापण्यासाठी जीवतोड मेहनत केली होती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महेश शिंदे म्हणाले, “2014 च्या निवडणुकीत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली. केंद्रात दोन मंत्रिपद आणि सत्तेत 10 टक्के वाटा देण्याचे आश्वासन भाजपने दिले. मात्र ती आश्वासने पाळली नाहीत. कामगार महामंडळावर नियुक्ती करू असे सांगत झुलवत ठेवले. युती व्हावी, यासाठी आठवले यांनी प्रयत्न केले. मात्र युती झाल्यावर आठवलेंनाच दुर्लक्षित केले जात आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या महामंडळ नियुक्त्यांमध्ये चळवळीशी संबंध नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून भाजपने जातीयवादी भूमिका दाखवून दिली आहे. याचा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष आहे. म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असून, यापुढे भाजपविरोधात काम करणार आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहोत.”

हनुमंत साठे म्हणाले, “राज्यातील 19 पेक्षा जास्त जिल्ह्यात मातंग चळवळ कार्यरत आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षे काम करत आहे. अण्णाभाऊ साठे मंडळावर नियुक्ती करण्याचे वारंवार आश्वासन दिले गेले. मात्र, ते पाळले नाही. मातंग समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत. जातीयवादी भाजपने रिपब्लिकन कार्यकर्त्यांची आर्थिक आणि सामाजिक कोंडी केली आहे. त्यामुळे यापुढे भाजपाला रिपब्लिकन जनता मतदान करणार नाही. राज्यभर फिरून भाजपाविरोधात प्रचार करणार आहोत. मातंग समाज, कामगार यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांनाच निवडून देण्याचे आवाहन करणार आहोत. निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपकडून डावलण्यात येत आहे. त्यामुळे मातंग आघाडीची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसेच येत्या 10 एप्रिलपर्यंत राजकीय भूमिका स्पष्ट करू.”

यावेळी बोलताना संगीता आठवले म्हणाल्या, “पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांची ससेहोरपळ थांबवण्यासाठी पदांचा राजीनामा देत आहोत. दलित चळवळ कमकुवत करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. गरीबांसाठी हे सरकार नाही. त्यामुळे आपण सर्वानी याविरोधात आवाज उठविला पाहिजे.”

यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे, संदेश साळवे, रामभाऊ कर्वे, गौतम माने, बापू शिंदे, उनवणे ताई यांच्यासह मातंग आघाडीचे संदीप गायकवाड, कैलास अवचिते, लेखन कांबळे, सुनील जाधव, खंडू शिंदे, सुषमा कांबळे यांच्यासह आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.