‘या’साठी पीएम नरेंद्र मोदी सिनेमाची टीम साई दरबारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनावरील स्थगितीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलली आहे. निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहताच बंदी घातली, असे म्‍हणणे निर्मात्यांनी आपल्या याचिकेत मांडले आहे. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे की ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर बंदी आणावी की नाही हे निवडणूक आयोगाने चित्रपट पाहूनच ठरवावे. तसेच त्याचा अभिप्राय बंद लिफाफ्यात २२ एप्रिलपर्यंत कळवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

यानंतर आता या चित्रपटाच्या टीमने शिर्डीच्या साई बाबाच्या चरणी धाव घेतली आहे. टीमने, चित्रपटाचे विघ्न टळो आणि लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित व्हावा असे साकडे साई बाबांना घातले आहे. सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉय हा देखील यावेळी उपस्थित होता. सर्व टीमने साई बाबांना साकडं घालत त्यांच दर्शन घेतलं यानंतर विवेक ओबेरॉयने पत्रकारांशी संवाद साधला आणि या चित्रपटाचा विरोध करणाऱ्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकारांशी बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला की, “पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा प्रत्येक देशभक्ताला नक्कीच आवडणार. जे लोक चित्रपटावर आक्षेप घेत आहेत त्यांना मी हा सिनेमा पाहण्यासाठी आमंत्रित करतो. सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा पहावा. उर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज हे माझे चांगले मित्र असून ते चित्रपटाचा ट्रेलर पाहून भ्रमित झाले आहेत. चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्या राहुल गांधीसह सर्वांनीच हा सिनेमा नक्की पहावा.”

पुढे बोलताना विवेक म्हणाला की, “रेल्वे स्थानकावर एक चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो. एवढेच नाही तर तो जगात आपले नाव उंचावतो ही तरुणांसाठी प्रेरणादायी बाब आहे.

सर्वांनी या चित्रपटासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करावी” असे आवाहन विवेक ओबेरॉय याने केले. दरम्यान सोमवार (दि २२ एप्रिल रोजी) या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत निकाल येणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत नेमका काय निर्णय येतो याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत.