Corona Vaccine : ‘सीरम’चा केंद्राला इशारा, म्हणाले – ‘US च्या ‘त्या’ धोरणांमध्ये वेळीच हस्तक्षेप करा, अन्यथा लसीचा प्रचंड तुटवडा भासणार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेने संरक्षण उत्पादने कायदा लागू केल्याने कच्चा माल मागविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा अन्यथा कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा भासण्याचा इशारा कोरोना लस बनविणारी पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया कंपनीने केंद्र सरकारला दिला आहे. जर लस वेळेवर मिळाली नाही तर त्याचा थेट परिणाम लसीकरणावर आणि कोरोना लढ्यावर जाणवणार असल्याने ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण होणार आहे. केंद्र सरकारने अमेरिकेच्या या धोरणांमध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी सीरमने केली आहे.

याबाबत सीरमचे इन्स्टीट्यूटचे सरकार आणि संस्थांशी संबंधित प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी शनिवारी (दि. 6 मार्च) रोजी केंद्र सरकारचे अर्थ सचिव अनूप वधावन आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला या दोघांना पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सीरम बनवत असलेली कोरोनाची कोविशिल्ड ही लस जगभरात वापरली जात आहे. तसेच सीरम नोवावॅक्स, कोडेगेनिक्स (अमेरिका) सारख्या कंपन्यांशी तांत्रिक सहकार्यातून अन्य कोरोना लसी बनविण्याचे काम करत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल लागणार आहे. हा माल प्रामुख्याने अमेरिकेवर अवलंबून आहे. अमेरिकेने संरक्षण उत्पादने कायदा लागू केल्याने कच्चा माल मागविण्यासाठी अडचणी येत आहेत. अगोदरच देशाची आणि नंतर जगाची मागणी मोठी असल्याने लस उत्पादनावर मोठा दबाव आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर महिनाभरात दुसऱ्या लसीचा डोस देण्यासाठी मागणी वाढलेली आहे. अशातच जर कच्चा माल मिळाला नाही तर उत्पादन जवळपास ठप्प होण्याची भीती या पत्रात व्यक्त केली आहे.