….म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची घेतली भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत ‘कृष्णकुंज’वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. उदयनराजे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र मनसेकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच या भेटीचे फोटोसुद्धा शेअर करण्यात आले आहे.

उदयनराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांत अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांनी या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली होती. हि भेट त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी घेतली होती. तसेच उदयनराजे यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात भेट घेतली होती. त्यानंतर आज सायंकाळी ६ वाजता त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी उदयनराजे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना भेट म्हणून राजमुद्रा दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. उदयनराजे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने संपूर्ण राज्याचे या भेटीकडे लक्ष लागलं होतं. त्यात आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी हि भेट होत असल्याने मराठा आरक्षणासंदर्भातच ही भेट होत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र या भेटीचं मनसेकडून स्पष्टीकरण देण्यात आल्याने सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.