मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपची आक्रमक भूमिका, दिला ‘हा’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने (BJP) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांसोबत आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी दिला आहे.

मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलकांची प्रवीण दरेकर यांनी आज (रविवार) भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरेकर म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायलयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.

हे गेंड्याच्या कातडीचे सरकार

मराठा समाजाचा आक्रोश थांबला असेल, त्यांची ताकद संपली असेल, असे राज्य सरकारला वाटत असेल, त्यामुळेच या आंदोलनाचा आवाज सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. मराठा समाजासोबत फक्त खेळवा-खेळवीचे राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.