उपोषण मागे, सहा महिन्यांची वाट बघणार, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार : अण्णा हजारे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रामलीला मैदानावर सुरु असलेले उपोषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सातव्या दिवशी मागे घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करुन अण्णांनी उपोषण सोडले. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या सरकारने तत्वत: मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या वाचून दाखवल्या. जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचे गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु होते. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र अण्णा हजारेंची प्रकृती खालावली होती. त्यांचे वजन सहा किलोंपेक्षा कमी झाले होते. तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. यानंतर सरकारने वेगाने हालचाली करत सुरुवातील गिरीश महाजन यांच्याकडे मध्यस्थीची जबाबदारी दिली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आणि रामलीला मैदानावर जाऊन अण्णांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी आली आणि अण्णांनी उपोषण सोडले.

“सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित सगळ्या मान्य केल्या आहेत. लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्ताची नेमणूक अद्याप झालेली नाही. सरकारने आमच्याकडे सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, सहा महिन्यांआधी आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संघटनांचे आभार,” असं अण्णा हजारे म्हणाले.

दरम्यान, मागण्या मान्य झाल्या असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची वाट बघणार, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार, असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला.