भाजप आमदाराच्या लग्नात कोरोनाविषयक नियमांचा ‘बॅण्ड’, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरा, नियम पाळा असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जात आहे. मात्र स्वत:ला जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे आमदारच या नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत. माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांचा लग्न सोहळा रविवारी (दि. 20) पुण्यात थाटामाटात पार पडला. मात्र या विवाह समारंभात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला. लग्नाला उपस्थित असलेल्या अनेक मोठ्या नेत्यांनी मास्कदेखील घातले नव्हते. सोहळ्यात कोरोनाविषयक नियमांना तिलांजली देण्यात आली.

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरीही धोका कायम आहे. तरी देखील राज्यातले भाजप नेते लग्न समारंभात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. पुण्यात संपन्न झालेल्या राम सातपुतेंच्या सोहळ्याला 500 हून अधिक जणांची उपस्थिती होती. यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. या नेतेमंडळींसह लग्नाला हजर असलेल्या इतरांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील दिसत नव्हते. त्यामुळे आता या प्रकरणी कोणती कारवाई केली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

…मग नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत का ?
आमदार राम सातपुते यांच्या लग्नातील गर्दी पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्यांसाठी लग्नाला केवळ 50 पाहुण्यांना बोलावण्याची परवानगी असताना लोकप्रतिनिधींनी लग्नाला शेकडोच्या संख्येने गर्दी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेते मंडळी नियम सर्रास धाब्यावर बसवतात. मग नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत का, असा सवाल देखील या सोहळ्यानंतर विचारला जात आहे.