PM मोदींच्या ‘त्या’ घोषणेनंतर सोशल मिडियावर #ModiJi आणि #NoSir ट्रेंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या सोशल मिडियाच्या जोरावर २०१४ मध्ये भाजपाने केंद्रात सत्ता मिळविली व नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. भाजपाच्या प्रचाराचा कणा असलेल्या त्याच सोशल मिडियावरुन संन्यास घेण्याचा विचार भारताला डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवर बोलवून दाखविले. त्यातून देशभरात एकच खळबळ उडाली.

काही मिनिटातच ‘नो सर’ आणि ‘मोदीजी’ हे ट्रेंड होऊ लागले. मुख्यमंत्री ते पंतप्रधान दरम्यानच्या मोदी यांच्या प्रवासात सोशल मिडियाचा मोठा वाटा आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचे फॉलोअर्स असलेले मोदी जर सोशल मिडियावरुन बाजूला झाले तर त्यांना फॉलो करणारेही मोठ्या संख्येने दूर जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात येऊ लागला. अमृता फडणवीस यांनी आपण आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकणार, असे तातडीने जाहीर करुन टाकले. त्याचबरोबर मोदी खरोखरच सोशल मिडियावरुन संन्यास घेणार का अशी चर्चा सुरु झाली.

मोदींचे फॉलोअर्स असणार्‍यांनी नो सर ही मोहिम सुरु केली आहे. त्याचवेळी विरोधकांनी त्यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करीत आपल्या नावावर दुसर्‍या धमकी देण्याचे काम करणार्‍या आपल्या ट्रोल आर्मीला हा सल्ला आपण देणार का असा खोजक प्रश्न विचारला आहे.

तर काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, मोदी यांनी आता फक्त तसा विचार केला आहे. मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखविले आहे. मग ते त्यापासून दूर जाण्याचा विचार कसा करु शकतात?.

तर अनेकांनी सोशल मिडियावर सुरु असलेल्या शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकुरामुळे व्यथित व्हायला होते असे सांगून सोशल मिडियापासून काही काळ दूर राहणे योग्य असल्याचे म्हटले आहे.

मोदींच्या मनात असा विचार का आला?

ज्या सोशल मिडियामुळे ते पंतप्रधान झाले, त्या मिडियापासून दूर होण्याचा विचार त्यांच्या मनात का आला, अशी चर्चा सुरु झाली आहे. मोदी-शहा या जोडगळीच्या विरोधात सर्व सोशल मिडियाने व्यापलेली दिसून येत आहे. त्याला तोंड देण्यास भाजपाच्या व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीला यश आलेले नाही. दिल्लीतील दंगल तसेच शाहीनबाग, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या या व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीला अपयश आले आहे. अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे २५ लाख व्हॉटसअप ग्रुप आहेत. त्यावरुन आम्ही काहीही पसरवू शकतो, असे सांगितले होते. मात्र, सध्या या पीएम आणि एचएम या जोडगोळीला ट्रोल केले जात आहे. त्यामुळे व्यथित होऊन ते या निर्णयापर्यंत आले की या सर्व प्रकारामधूनही आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हा स्टंट केला असावा असे बोलले जाऊ लागले आहे.

मोदींच्या या घोषणेनंतर या सोशल मिडियाचा मोदी व भाजपाच्या आयटी सेलने कसा गैरवापर केला याची माहिती वेगाने समोर येऊ लागली आहे.