उमेदवारांनो बजेट सांभाळा ! आता सोशल मीडियाचा वापर प्रचारखर्चात धरणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. उमेदवारांना सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर लक्ष असणार असून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यास तो प्रचारखर्च समजण्यात येणार आहे. याबाबतची माहिती माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आलेल्या तयारीविषयी माहिती देताना ते बोलत होते.

नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर केल्यास तो प्रचारखर्च समजला जाणार आहे. तो खर्च कसा ठरवायचा, याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार हिशोब करून उमेदवाराच्या खर्चामध्ये त्याचा समावेश होणार आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ती समिती निर्णय घेणार आहे. समितीच्या निर्णयाविरोधात एखाद्या उमेदवाराने अपिल केले आणि निवडणुकीनंतर उमेदवाराच्या विरोधात निकाल लागल्यास संबंधित विजयी उमेदवाराचे पद जाऊ शकते. ‘
आयकर विभागाच्या साह्याने कारवाई – ‘निवडणुकीच्या काळात उमेदवार किंवा त्याच्या समर्थकांकडून रोख रक्कम नेण्यात येत असल्यास भरारी पथकांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ६३ भरारी पथके असणार आहेत. या पथकांना रोख रक्कम जप्त करण्याचे अधिकार आहेत. मात्र, घरामध्ये रक्कम असल्यास आयकर विभागाच्या साह्याने कारवाई होणार आहे. आचारसंहितेच्या काळात बँक खात्यामध्ये मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्यास संबंधित बँकेकडे चौकशी केली जाणार आहे.’असेही राम यांनी स्पष्ट केले.

cVIGIL ॲपवरून करा तक्रार – आचरसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी निवडणुकीच्या काळात cVIGIL हे मोबाइल ॲप उपलब्ध करण्यात येणार आहे. तक्रार आल्यानंतर १०० मिनिटांमध्ये कारवाई होणार आहे. या ॲपवरून नागरिकांना माहिती आणि फोटो काढून पाठविता येणार आहेत. तक्रार आल्यानंतर ५० मिनिटांमध्ये तक्रारीची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार असून, त्वरित कालावधीत कारवाई होणार आहे.