दिवसाढवळया रेल्व स्थानकात मुलीला ‘या’ विकृत युवकानं केलं KISS, घटना CCTV मध्ये ‘कैद’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर येत असताना मुंबईत असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मुंबईतील मुली सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हिंगणघाट आणि औरंगाबादमधील सिल्लोडयेथील जळीतकांडाच्या घटना ताज्या असताना मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृताने मुलीला पाठिमागून येऊन तिचे चुंबन घेऊन पळून गेला. हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

व्हिडीओमध्ये फुटओवर ब्रिजवरून एक मुलगी जात असताना एका विकृत प्रवृत्तीच्या तरुणाने मुलीला पाठिमागून येऊन तिचे चुंबन घेतल्याचे दिसत आहे. मुलीचे चुंबन घेऊन हा तरुण लगेच तेथून पळून जाताना दिसत आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे मुलगी भांबावून गेली. ती त्याला प्रत्युत्तर देण्याच्या आधीच हा तरुण तेथून पळून गेला. घाबरल्यामुळे मुलीने त्याचा विरोध न करता ती तेथून निघून गेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने रेल्वे पोलिसांकडे याची तक्रीर केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून विकृत तरुणाला अटक केली आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी माटुंगा स्टेशनवर दुपारी घडली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असल्या तरी वारंवार अशा घटना घडत असल्याने मुंबईत शिक्षणासाठी, कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.