…म्हणून Facebook नं गेल्या 3 महिन्यात 70 लाखापेक्षा अधिक पोस्ट हटवल्या

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोना संदर्भात दिशाभूल करणाऱ्या अनेक पोस्ट फेसबूकवर पोस्ट करण्यात आल्या आहेत. फेसबुकने चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्टविरोधात कारवाई केली आहे. दुसऱ्या तिमाहीत फेसबुकने कोरोना संबंधात 70 लाख खोट्या, गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट हटवल्या आहेत. यामध्ये व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अविश्वसनीय उपायांशी संबंधित पोस्टचा समावेश आहे.

फेसबुकने Community Standards Enforcement Report अंतर्गत, ही आकडेवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात फेसबुककडून सांगण्यात आले की, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरवण्यापासून, रोखण्याच्या दिशेने ते सातत्याने काम करत आहेत. सोशल मीडिया फेसबुकने, दुसऱ्या तिमाहीत द्वेष पसरवणारी 2.2 कोटी भाषणं आपल्या प्लॅगशिप ॲपवरून हटवली आहेत.

यादरम्यान फेसबुकने दहशतवादी संघटनांशी संबंधित जवळपास 87 लाख पोस्टही हटवल्या आहेत तर गेल्या तीन महिन्यात 63 लाख पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरस संदर्भात सोशल मीडियावर सतत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, असे फेसबुकचे म्हणणे आहे. हीच बाब लक्षात घेता फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्यांनी, दिशाभूल करणारी माहिती प्रसरविण्यांविरुद्ध कारवाईची मोहिम सुरु केली आहे.