बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 9 जणांविरुद्ध FIR

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – CAA आणि NRC विरोधात पुकारण्यात आलेल्या बीड बंदला हिंसक वळण लागले. बीड बंद दरम्यान दगडफेक करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरवण्यात आली. सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सहा पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध भादवि कलम 505 (2) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बीड बंद दरम्यान सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गेवराई, पिंपळनेर, माजलगांव शहर, धारूर, सिरसाळा आणि नेकनूर या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेवराई पोलीस ठाण्यात संतोष उर्फ पप्पू रामकिसन भोसले, सचिन भगवानराव दाभाडे, रवी प्रभाकर काळे, अमोल उद्धवराव पौळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सतिश धोंडीबा बोठे, सिरसाळा पोलीस ठाण्यात बाळासाहेब वैजीनाथ पाथकर, पिंपळनेर येथे दिपक बाबूराव घाटे, नेकनूर येथे सागर ज्ञानेश्वर शिंदे आणि धारुर पोलीस ठाण्यात सचिन आप्पाराव साकराते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 9 जणांवर जाती-जमातीमध्ये शत्रूत्व निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध करुन समजात द्वेष, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यासाठी तीन वर्षे सश्रम कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशी तरतूद असून आरोपींना लवकरच अटक करुन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अफवा सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून पसरवू नये. पोलिसांची 24 तास सोशल मीडियावर नजर असून अशा अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/