Rafale Deal : ‘राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल सुप्रिम कोर्टात राफेल डील प्रकरणी सुनावणी सुरु होती. यादरम्यान राफेल डिलच्या फाईल्स संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्या आहेत अशी माहिती सरकारतर्फे सुप्रिम कोर्टात देण्यात आली. राफेल डीलची कागदपत्रे चोरीला गेल्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध घोषणा, भाजपाचे सुरक्षेचे दावे, सरकारच्या विविध योजना या सगळ्याचा संबंध चोरीला गेलेल्या राफेलच्या कागदपत्रांशी लावत सोशल मीडियानं सरकारची जोरदार खिल्ली उडवली आहे.

राफेल डीलची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती काल महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी सुप्रिम कोर्टात दिली. यानंतर सरकारला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. कागदपत्रं कशी सांभाळायची हे शिवसेनेला विचारा, त्यांना ५ वर्ष राजीनामे सांभाळायचा अनुभव आहे, असं ट्विट एकानं केलं. पाकव्याप्त काश्मीरमधील एअर स्ट्राइकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित हातात असल्याची भावना व्यक्त केली होती. या विधानाचाही सोशल मीडियानं समाचार घेतला. कागदपत्रं सांभाळता येत नाही आणि म्हणे देश सुरक्षित हातात आहे, असा टोला अनेकांनी सरकारला लगावला.

https://twitter.com/Rajeshkhedeka14/status/1103548744807604225

नेटकऱ्यांनी मोदींच्या अनेक विधानांचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणतात. तरीही कागपत्र कशी चोरीला जातात असेही प्रश्न सोशलवर उपस्थित होताना दिसत आहेत. काहींनी याचा संबंध डिजिटल इंडियाशीही जोडला आहे. कागदपत्रांच्या डिजिटल कॉपी तयार केल्या असत्या, तर ही वेळ आली नसती, असं मत काहींनी व्यक्त केलं. तर काहींनी ‘मोदी है तो मुमकिन है’ या भाजपाची घोषणेची खिल्ली उडवली.

https://twitter.com/HAL_India/status/1103297861221937152

काहींनी तर थेट इतिहासात धाव घेतली आहे. कागदपत्र नेहरूंनी चोरली असतील असं मोदी म्हणतील आता, असंही ट्विट काहींनी केलं आहे. या ट्विटसोबत मोदींनी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ घोषणेचीही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. नेहरुंचा हातात ब्रिफकेस घेतलेला फोटो काहींनी पोस्ट केला आहे. त्या ब्रिफकेसमध्येच राफेल डिलची कागदपत्रं असतील, असं ट्विट करत नेहरुंच्या फोटोसोबत ‘मेरा भूत सबसे मजबूत’ अशी ओळदेखील काहींनी लिहिली आहे.