‘ज्यांना उत्तरं देणं मला आवश्यक वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते’ – नेहा पेंडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडे काहीही केलं तरी समाज माध्यमात सेलिब्रिटींना नेटीझन्स ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे. नेटीझन्स काहीही विचार न करता सेलिब्रिटींना विनाकारण ट्रोल करतात. सेलिब्रिटींनी साधा फोटो शेअर केला आणि तो त्यांना आवडला नाही तरी ट्रोल करणे सुरु होते. हीच गोष्ट बेधडक, बिनधास्त आणि रोखठोक अंदाज अशी ओळख असणाऱ्या नेहा पेंडसेला फार खटकत असल्याचे तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.

नेहा म्हणाली, अनेकदा सेलिब्रिटींच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींची चर्चा सर्वाधिक रंगलेली असते. अशा ट्रोलर्सना उत्तर देणे मी गरजेचे समजत नाही. अनेकदा मलाही ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. पण, या गोष्टींचा मला फारसा फरक पडत नाही. मी अशा ट्रोलर्सना दुर्लक्षित करणे पसंत करते, असेही तिने म्हटले.

नेहाला मध्यंतरी तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आले होते. तसेच उद्योगपती शार्दूल सिंग बयास याच्यासोबत नेहाने मराठमोळ्या पद्धतीने लग्न गाठ बांधल्यावरही तिला ट्रोल केले होते. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमात तुफान व्हायरल झाले होते. तिचे फोटो बघून नेहाने पैशासाठी लग्न केले, असे नको नको ते आरोप तिच्यावर ट्रोलर्सनी लावले होते. तेव्हा मात्र नेहाचा पारा चांगलाच चढला होता.

मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेली नेहा ‘मे आय कम इन मॅडम’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचली. त्याशिवाय नटसम्राट या मराठी चित्रपटातही तिने काम केलं आहे.

लग्नानंतर तिने काही दिवस विश्रांती घेतली होती. परंतु, आता पुन्हा ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतून दमदार पदार्पण केलं आहे. ‘अनिता भाभी’ बनत पुन्हा एकदा तिचे दर्शन रसिकांना घडत आहे. अनेक दिवसांपासून तिचे चाहते तिला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर या मालिकेच्या निमित्ताने नेहाच्या चाहत्यांचीही ईच्छा पूर्ण झाली आहे.