‘भाजपाचा अपप्रचार काँग्रेसचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ हाणून पाडतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी काळात कॉंग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे, भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सोशल मिडिया विभागातर्फे केले जाणार आहे. तसेच भाजपातर्फे सोशल मीडियावर सुरु असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ हाणून पाडतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाची 428 पदाधिका-यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. नव्या कार्यकारिणीत 48 जिल्हाध्यक्ष 252 विधानसभा अध्यक्ष,118 प्रदेश कार्यकारिणी सदस्य व 10 कोअर कमिटी सदस्य आहेत.

2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच लॉकडाऊनच्या काळात पक्षाची भूमिका जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम सोशल मीडिया विभागाने अतिशय प्रभावीपणे केले. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा सारासार विचार करून मोठ्या छानणी प्रक्रियेतून या 428 पदाधिका-यांची निवड केल्याचे सपकाळ म्हणाले.