‘कोरोना’ मुक्तीसाठी मानाच्या गणपतींना बांधले तोरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   आपलं पुणं, आपला देश आणि सगळे जगचं कोरोनामुक्त व्हावे असे साकडे घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानाच्या पाच गणपतींना अकरा नारळांचे तोरण बांधले आणि विघ्नहर्त्या गणरायापुढे नतमस्तक होऊन प्रार्थना केली.

कोरोना साथीच्या सावटाखाली यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. या साथीने साऱ्या जगाला व्यापून टाकले आहे. पुण्यात अलिकडे कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. देशातही तीस लाखाहून अधिक नागरिक बाधित झाले. या साथीने अर्थचक्रसुद्धा ठप्प झाले. मानवजातीची यातून मुक्तता व्हावी असे साकडे विघ्नहर्त्या गजाननाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातले आणि श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री गुरुजी तालीम मंडळाचा गणपती, श्री तुळशीबाग मंडळाचा गणपती आणि केसरी वाडा गणपती या मानाच्या पाच गणपतींना तोरण बांधण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा उपक्रम समाजहिताच्या भावनेतून राबविला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कसबा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण करपे, चेतन आगरवाल, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी मानाच्या गणपती मंडळांच्या अध्यक्षांचा पुणेरी पगडी देऊन मोहन जोशी आणि रमेश बागवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवत सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा साधेपणाने उत्सव साजरा केला याबद्दल मानाच्या गणपती मंडळांच्या अध्यक्षांचा प्रातिनिधिक सत्कार केला असे मोहन जोशी यांनी सांगितले.