स्वच्छता कर्मचाऱ्यांनो भीती न बाळगता दक्षता घ्या : सोनकांबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल चार महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाची महामारी सुरू आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगता दक्षता घेतली पाहिजे. आपण, आपला परिसर स्वच्छ ठेवा, दिवसभर काम करून घरी गेल्यानंतर आंघोळ करावी, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग असे शासनाने नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करा आणि इतरांनाही सांगा, असे मत ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांनी व्यक्त केले.

यशोत्तम जनहित प्रतिष्ठानच्या वतीने घोरपडी, भीमनगर, शक्तिनगर व बी. टी कवडे रस्ता परिसरातील अत्यावश्यक सेवेतील ११० कर्मचाऱ्यांना मोफत स्वच्छतेविषयीचे कीट देण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चंदन, आरोग्य निरीक्षक संदिप रोकडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन वाबळे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या वेळी उपस्थित होते. इगल बर्गमन इंडिया प्रा.लि यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

बालगुडे म्हणाले की, न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अभ्यासानुसार एका तासामध्ये आपण 25 वेळा नाक, कान, चेहऱ्याला स्पर्श करतो. त्यामुळे प्रत्येक दोन तासांनी तुम्ही साबणाने हात स्वच्छ केले पाहिजेत. स्वच्छता कर्मचारी शहराचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.