गुळुंचे येथील प्रसिद्ध काटेबारस यात्रा यंदा भाविकाविना साधेपणाने साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन  –   संंपुर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारस यात्रा यंदा कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुुळे शासनाच्या निर्बंधाचे पालन करीत मानकरी, खादेकरी यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.२६)परंपरागत विधी व पुजा करीत भाविकाविना साधेपणाने संपन्न झाली.

गुळूंचे ( ता.पुरंदर ) येथील काटेबारस यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून दिवाळी पाडव्यापासून यात्रेला सुरूवात होऊन कार्तिक शुद्ध द्वादशीला यात्रेच्या मुख्य दिवशी काटेमोडवणाने यात्रेचा समारोप होत असतो. हा रोमांचकारी क्षण पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक यात्रा पाहण्यास गर्दी करीत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात झाल्याने प्रशासनाने भाविकांची गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मानकरी व खांदेकरी यांच्या उपस्थितीत गेली बारा दिवस पुजा करण्यात आली, मंदीराच्या अग्नेय दिशेला समया तेवत ठेवण्यात आल्या होत्या. तसेच बुधवारी (दि.२५) मानाची काठी व उत्सव मुर्तींना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नीरा स्नान घालण्यात आले.

गुरुवारी (दि.२६) यात्रेच्या मुख्य दिवशी यात्रा कमिटी व मोजक्या लोकांत सकाळी भजन , टाळ मृदुंंगाच्या गजरात पालखी बहीणीच्या भेटीस नेण्यात आली. पालखी मानाची काठी घेऊन आल्यानंतर काट्यांना पाच प्रदक्षिणा मारून काट्यांची पुजा करण्यात आली. त्यानंतर काट्यांंचा ढीग पेटवून यात्रेची सांगता करण्यात आली.

शेकडो वर्षाची परंपरा असलेली काटेबारस यात्रा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकाविना सुनी सुनी वाटत होती. दुपारपर्यंत मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांना घरातूनच देवाला नैवेद्य दाखवावा लागला. दरवर्षी गुळूंचेकरांमध्ये असलेल्या उत्साहाला यंदा निर्बंध आल्याने गुळूंचे ग्रामस्थ भावनिक झाले होते.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

पोलिस प्रशासनाच्या कडक निर्बंधामुळे बाहेरील भाविकांनी गावात गर्दी करू नये याकरिता गुळूंचे ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वार बंद करून प्रवेश बंद केला होता. यावेळी जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय वाघमारे, नंदकुमार सोनवलकर यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

You might also like