सुटीत विद्यार्थ्यांचे मोफत समुपदेशन, राज्य शिक्षण मंडळाचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे मागिल दोन महिन्यापासून देशभर लॉकडाऊन केले असून, उद्योग, व्यवसाय, कंपन्या आणि महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण विभागानेही शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी घरात बंद झाले आहेत. करोनाची टांगती तलवार सर्वावर आहे. मात्र, त्यातून मार्ग काढून शिक्षण विभाग ‘ई-लर्निग’चा दर्जा सुधारण्यासाठी करत आहे. नवीन शैक्षणिक वर्षांसाठी ई-लर्निगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांची ओळख करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरूवात सध्या राज्य शिक्षण मंडळाकडून मोफत समुपदेशनाने केली आहे.

देशभर लॉकडाऊन असल्याने विद्यार्थी वर्ग कमालीचा अस्वस्थ झाला आहे. शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ते कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता असतांना ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून शिक्षण विभाग या सर्व विद्यार्थ्यांशी जोडला गेला आहे. दुसरीकडे, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील अभ्यासाविषयी आणि नव्या शैक्षणिक वर्षांविषयीची भीती वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भय दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि समुपदेशक यांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. १० वी आणि १२ वी नंतर पुढे काय, करिअरच्या विविध वाटा, मानसिक गोंधळ, अस्वस्थता, करोना प्रादुर्भाव यासह १० वी कल आणि अभिक्षमता चाचणी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे विभागात समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर संबंधितांची नावे, त्यांचे संपर्क क्रमांक याची माहिती देण्यात आली आहे.

पुणे शिक्षण मंडळ एसएससी बोर्डाचे सचिव बबन दहिफळे म्हणाले की, मे महिन्याच्या अखेरीस अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू होतो. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे बंद आहेत. शिक्षण विभागाकडून या पार्श्वभूमीवर एक नवे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना घर बसल्याही माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती पुणे विभागाचे सचिव बबन दहिफळे यांनी दिली. याशिवाय काही खासगी शिक्षण संस्थांनी १० वी अभ्यासक्रमावर आधारित काही चित्रफिती तयार केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाच्या तोंडओळखसह सखोल माहिती मिळत आहे. दृकश्राव्य माध्यमातून त्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. तसेच १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात येत असून, ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातील. उत्तरपत्रिका तपासून त्रुटींची माहिती दिली जाईल, असे दहिफळे यांनी नमूद केले.

दृकश्राव्य माध्यमातून वेगवेगळे प्रयोग

पहिल्या टप्पात १० वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात कसे गुंतवून ठेवता येईल, यापेक्षा त्यांचा अभ्यास आनंददायी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची फळी काम करत आहे. नाशिक जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील शिक्षक दृकश्राव्यच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करत असून विद्यार्थ्यांसाठी ते लवकरच खुले होतील.

कोरोनामुळे मुलांमध्ये नैराश्य येऊ नये यासाठी नवीन उपक्रम हाती घेत आहोत. सुट्टीचा कालावधी वाढल्यास मुलांची अभ्यासाची सवय मोडू शकते. त्यामुळे येत्या काळात नवनवीन संकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न राहील.

बबन दहिफळे- सचिव, पुणे बोर्ड