परभणी : पाथरीत विविध सामाजिक संघटनांच्या वतीने CAA आणि NRC विरोधात आंदोलन

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशाला मैदानावर नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याविरुद्ध मोर्चा काढून निषेध सभा घेण्यात आली. पाथरी येथे आयोजित जिल्हा प्रशाला मैदानावर सभेत सुधारणा नागरिकत्व कायदा  (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) चा निषेध करण्यात आला.

जिल्हा प्रशाला मैदान शुक्रवारी दुपारी तीन वाजल्या पासून उपस्थितांनी भरून गेले होते. यावेळी आयोजित सभेत राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) कायद्याविरुद्ध निषेध फलक, महापुरुषांची प्रतिमा फलक, राष्ट्रीय ध्वज, निळा, पिवळा, भगवा, झेंडे हाती घेऊन अनेकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आयोजित सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Pathri

आयोजित सभेत भाजप, मोदी, शहा, यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार हे जनतेमध्ये भयाचे वातावरण निर्माण करत आहे. सरकारच्या या धोरणाने समाजामध्ये अस्थिरता निर्माण होत असून याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. मोदी यांच्या काळात महिला, मुली, बालक असंख्य घटक ही असुरक्षिततेची भावना व्यक्त करीत आहेत.

भाजपने निवडणुकीत सबका साथ सबका विकास नारा दिला होता आज मात्र राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) असे कायदे आणत आहेत. त्यामुळे भाजपचा छुपा अजेंडा स्पष्ट होत आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा हा केवळ मुस्लिमांविरुद्ध नसून हा भारतीय लोकांविरुद्ध असल्याचे सांगण्यात आले.

मौलाना जब्बार यांच्या नेतृत्वाखाली चौक बाजार पाथरी येथून जिल्हा प्रशाला मैदानावर निषेध मोर्चा काढण्यात आला त्‍यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी आयोजकांच्या वतीने एनआरसी कायद्याला लागणाऱ्या पुरावे आम्ही सरकारला देणार नाही असा संकल्प करण्यात आला. एकमेकांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहू असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मौलाना जब्बार, शफी फारुखी, मौलाना शेख हारून, रेखाताई मनेरे, कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, अब्दुल नईम अन्सारी, मौलाना कैसर इशा आती, विकास पाथरीकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी पाथरी शहरात एकीकडे रस्त्यावर शुकशुकाट होता तर जिल्हा प्रशाला मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/