काळ्या, वड्ड्या, टूनटून्या म्हणणारा आवाज हरपला..

दौंड : अब्बास शेख : पोलीसनामा ऑनलाईन

सोमवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि समाजसेवी जेष्ठ पत्रकार जगदीश वाळके  यांच्या अचानक निधनाची बातमी केडगाव परिसरात धडकली आणि डोळ्यांपुढे उभा राहीला १९९१ ते १९९७ पर्यंतचा ईयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा जवाहरलाल विद्यालयातील जुना काळ.

[amazon_link asins=’B002U1ZBG0,B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80e6311a-ab46-11e8-8cea-dfc1ac8a82cf’]

जगदीश वाळके हे तसे आपल्या विनोदी शैली आणि विनोदी भुतांच्या गोष्टींनी सर्वांना पोट दुःखेपर्यंत हसवून सोडणारे आणि तेवढेच डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून जवाहरलाल शाळेत परिचित होते. वाळके सरांचा क्लास म्हटला कि मुले एकच जल्लोष करायची, सरांनी वर्गात प्रवेश केला कि एक सुरात सर्व मुलांचा आवाज व्हायचा सर गोष्ट, सर गोष्ट… आणि होकार आला कि नुसता टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. मग सुरू व्हायची राम्या आणि भुत्याची गोष्ट. गोष्ट अशी रंगायची जणूकाही एखादा थरारक आणि तितकाच विनोदी शैलीतील सिनेमा थिएटरमध्ये पाहत आहोत असाच भास वाळके सरांची गोष्ट ऐकताना व्हायचा.

सर्वात गंमतीशीर बाब म्हणजे ज्या वर्गात एखादा उनाड, जाडजूड आणि मठ्ठ विध्यार्थी असायचा त्याला ये जाड्या, वड्ड्या, टून टून्या हे नाव सरांकडून हमखास मिळायचे. शाळेत विविध गोष्टींच्या माध्यमातून सर्व मुलांची मने जिंकणारे वाळके सर पत्ररितेच्या माध्यमातूनही आपल्या वाचकांची मने जिंकत होते.

दौंड शहर हे सरांचे गाव असले तरी त्यांची कर्मभूमी मात्र केडगावच होती कारण त्यांच्या हाताखालून कित्येक विध्यार्थी शिकून नंतर मोठे अधिकारी बनले. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगले वाईट दिवस येत असतात परंतु त्याचा स्वभावावर मात्र कधी परिणाम होऊ द्यायचा नाही हा अनमोल मंत्र वाळके सरांनी आपल्या विध्यार्थ्यांना दिला होता आणि विद्यार्थ्यांनीही वाळके सरांचा स्वभाव कधीच बदललेला पाहिला नाही. तोच रुबाब, तोच दरारा आणि तोच हसतमुख चेहरा ठेऊन जगदीश वाळके सरांनी २७ ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेतला आणि केडगाव परिसरात असणाऱ्या त्यांच्या आजी माजी  विद्यार्थ्यांच्या मनाला मोठा मानसिक आघात झाला.अश्या या हरहुन्नही आणि एव्हरग्रीन व्यक्तित्वास भावपूर्ण श्रद्धांजली.