कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला घेतलं पेटवून

कोल्हापूरः पोलीसनामा ऑनलाईन – नगरपालिकेत भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करूनही प्रशासन दखल घेतली जात नसल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने (social-worker-set-himself-on-fire-at-ichalkaranji) स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेच्या आवारात सोमवारी (दि. 26) अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली. या घटनेनंतर नगरपालिका परिसरात एकच गोंधळ उडाला असून याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नरेश भोरे असे या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भोरे हे 50 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, इचलकरंजी नगरपालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नरेश भोरे यांनी केला होता. याबाबत नरेश भोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेतली नाही.भोरे हे नगरपालिकेत आले आणि त्यांनी काही समजण्याच्या आत स्वतः वर रॉकेल ओतून घेतले. यात ते गंभीररित्या भाजले गेले आहेत. दरम्यान,पोलीस घटनास्थळी धाव घेत भोरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

आत्मदहनाचा दिला होता इशारा
अनेक वेळा, निवेदन आणि तक्रारी देऊनही त्याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली नाही. म्हणून दोन दिवसांपूर्वी भोरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरी देखील भोरे यांच्या इशाऱ्याकडेही इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी भोरे यांनी सोमवारी नगरपालिकेच्या आवारातच स्वतः च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सध्या त्यांच्यावर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितले जात आहे.

You might also like