धारावी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना सोसायटीचे दरवाजे बंद पोलिसांनीही घेतली नाही तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबईत सध्या कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. त्यात धारावीमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यास सोसायटीतील लोकांनी प्रवेश बंद केला आहे. इतकेच नाही तर तो रहात असलेल्या कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यानेही त्याची तक्रार घेतली नाही.

धारावी या आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचे संकट मोठे आहे. तेथे आतापर्यंत ८८८ कोरोना बाधित आढळून आले आहे. धारावीत बंदोबस्तासाठी आलेले राज्य राखीव पोलीस दलाचे शंभराहून अधिक पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावी म्हटले की कोणीही त्यांच्याजवळ जात नाही.

धारावी परिसरात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने त्यांना फुटपाथवर झोपावे लागत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धारावी पोलीस ठाण्यात काम करणार्‍या व इतके दिवस एकमेकांशी खेळीमेळीने राहणार्‍या सोसायटीतील सदस्यांचा विचित्र अनुभव एका पोलीस कर्मचार्‍याला आला आहे. ते कल्याणमधील मेहरनगरमध्ये रहातात.

हा पोलीस कर्मचारी धारावीत काम करतो, म्हणजे ते कोरोना बाधित असल्याचे समजून सोसायटीतील सदस्यांनी त्यांना सोसायटीत येण्यावर बंदी घातली आहे. त्याबाबत ते खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. पोलीस असूनही त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही.