डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला गरज – नगरसेविका हिमाली कांबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करून आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा त्यांचे विचार समाजामध्ये पेरण्याची गरज आहे. आज देश कोरोना महामारीच्या संकटामध्ये आहे. मागिल वर्षीही कोरोनामुळे आंबेडकर जयंती साजरी करता आली नाही. कोरोनाला हरविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत नगरसेविका हिमाली कांबळे यांनी व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हडपसर (शिंदेवस्ती) येथे बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, ज्ञानदिप बहुद्देशिय सामाजिक विकास संस्था तसेच संविधान सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत वाघमारे यांच्या वतीने साध्या पद्धतीने ध्वजारोहन व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदन म्हणण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगूडे, हडपसर रिपाइं युवक अध्यक्ष राजू कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग चव्हाण, उपाध्यक्ष पप्पू शेख, पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्षा लिंबोनी वाघमारे, शिंदेवस्ती अध्यक्षा आशा सावंत, अनिकेत गायकवाड, विजय वाघमारे, सिध्दार्थ वाघमारे, गणेश कामठे, अंकुश हणमंते, बबलु सिंग, रघुनाथ सोनवणे, ऐश्वर्या वाघमारे, दिशा सावंत, अश्विनी वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार अशोक बालगुडे म्हणाले की, उठा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याची जबाबदारी आपली आहे. सक्षम विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे. कोणावर अन्याय होत असेल, त्याला सनदशीर मार्गाने वाचा फोडली पाहिजे. कायद्याचे राज्य आहे, घटनेने प्रत्येकाला जगण्याचा अधिकारी दिला आहे. प्रत्येक नागरिकाला डॉ. बाबासाहेबांनी सन्मान मिळवून दिला आहे, त्यांचा आपल्याला स्वाभीमान आहे. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरूष, बोधीसत्व, भारतरत्न, आधुनिक भारताचे जनक, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.