‘त्या’ प्रकरणात सीबीआयने आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माझा भाऊ सोहराबुद्दीन व वहिनी कौसरबी यांच्या चकमक प्रकरणात सीबीआयने सखोल तपास केला नाही. सीबीआयने अशाप्रकारे तपास केला की जणू काही ते आरोपींच्या मदतीसाठीच काम करत आहेत, असा आरोप सोहराबुद्दीनचा लहान भाऊ रुबाबुद्दीन शेख याने सीबीआय विशेष न्यायालयात केला. त्याचवेळी या घटनेप्रकरणी सुरुवातीला तपास करणारे आयपीएस अधिकारी रजनीश राय यांच्यासह अन्य काहींना साक्षीसाठी न्यायालयात बोलवावे, अशी विनंती अर्जही रूबाबुद्दीन याने विशेष न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्याकडे सादर केला.
रुबाबुद्दीन हा सोहराबुद्दीनच्या कथित चकमकीच्या खटल्यात साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर होता. रूबाबुद्दीन याने न्यायालयास घटनेविषयीची माहिती हिंदीत दिली. तसेच आपली वहिनी कौसरबी कुठे आहे, हे आजही कळले नसल्याचे न्यायालयाला सांगितले. याप्रकरणी न्यायालयासमोर साक्ष देताना रूबाबुद्दीन म्हणाला, १६ नोव्हेंबर २००५ रोजी नजामुद्दीन, सोहराबुद्दीन व कौसरबी हे आपल्या झिरनिया या गावातून इंदूरला गेले होते आणि तेथून हैदराबादमध्ये ईदनिमित्त कलामुद्दीनला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत तुलसीराम प्रजापतीही होता. २२ नोव्हेंबरला नजामुद्दीनला फोन केला तेव्हा ते सर्व सांगलीला असल्याचे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला तेव्हा फक्त वाऱ्याची झुळूक ऐकू आली. त्यानंतर दोन दिवसांनी फोन केला असता, त्यावर अज्ञात व्यक्ती होती. २५ नोव्हेंबरला फोन लागतच नव्हता. त्यानंतर मी २६ नोव्हेंबरला नारडा जंक्शनवर गेलो असताना मला शाहनवाजुद्दीनचा फोन आला. सोहराबुद्दीनला बनावट चकमकीत ठार केल्याची बातमी कळली आहे, असे सांगत त्याने मला अहमदाबादला मृतदेह घेण्यास जाण्यास सांगितले. त्यावेळी लष्कर-ए-तय्यबाच्या शोराबजी सेठला ठार करण्यात आल्याचे बातम्यांमध्ये सांगत होते.

सोहराबुद्दीनचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आणण्यात आला. तेव्हा त्याला ठार का करण्यात आले? त्याने काय केले होते? आणि माझी वहिनी कौसरबी कुठे आहे?, असे प्रश्न मी एटीएसच्या एका अधिकाऱ्याला विचारले. कौसरबी गर्भवती होती आणि सीआयडी किंवा सीबीआयने त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही, ती माहिती दडवून ठेवली. सोहराबुद्दीन व कौसरबी हे बसमधून प्रवास करत असताना अचानक समोरून टाटा सुमो व क्वालीस गाड्यांनी बसची वाट अडवली आणि खोट्या चकमकीत दोघांना रिव्हाॅल्वरने गोळ्या झाडून ठार केले, अशी माहिती नजामुद्दीनने दिली होती. मी मृतदेहावरही आठ गोळ्यांच्या खुणा पाहिल्या होत्या, असे सांगताना रुबाबुद्दीन खूप भावुक झाला आणि ही घटना आठवली की मला नेहमी अस्वस्थ होते, असे तो म्हणाला. त्याचवेळी या खटल्यात आपला दुसरा भाऊ शाहनवाजुद्दीन तसेच अहमदाबादमधील पॉप्युलर बिल्डर्सचे रमण व दशरथ पटेल व आयपीएस अधिकारी रजनीश राय यांनाही साक्षीसाठी न्यायालयात बोलवावे, अशी विनंती न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली.

ठग ऑफ महाराष्ट्र ! विरोधी पक्षांची हटके पोस्टरबाजी