Solapur : मोहोळ सबजेलमधील 13 आरोपी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.  कोरोना व्हायरसने मोहोळ पोलीस ठाण्याच्या सबजेलमध्ये एंट्री केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या 20 पैकी 13 आरोपींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

मोहोळ पोलीस ठाण्याच्या सबजेलमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले 20 आरोपी आहेत. यापैकी 3 आरोपींना थंडी, ताप, सर्दीचा त्रास होऊ लागल्याने पोलिस प्रशासनाने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने डॉक्टरांनी त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली. यामध्ये तिघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले.

मंगळवारी (दि.9) त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 17 आरोपींची सबजेलमध्ये रॅपीड टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये 10 आरोपी कोरोना पॉझिटिव्ह तर 7 निगेटिव्ह आढळले. त्यामुळे मोहोळ सबजेलमधील कोरोनाबाधित आरोपींची संख्या 13 झाली आहे. कोरोना झालेल्यांमध्ये एका महिला आरोपीचा समावेश आहे. या घटनेमुळे मोहोळ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.