काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ‘मेकअप किट’ मुळे अडचणीत ; आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केल्या. आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आयोगाने केली आहे. या दोनही राज्यांमध्ये विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यामुळे महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप होत आहे.

माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यासंदर्भात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी मतदारांना ‘मेकअप बॉक्स’ गिफ्ट म्हणून वाटले. असे करताना त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा नरसय्या यांनी केला आहे. ही तक्रार जिल्ह्याचे कलेक्टर डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या नियमानुसार आचारसंहिता चालू असताना मतदारांमध्ये पक्षाचा प्रचार करण्यासाठी कोणत्याही भेटवस्तू देण्यास किंवा कसलेही प्रलोभन दाखवण्यास बंदी असते. मात्र प्रणिती शिंदे यांनी आज आचारसंहिता लागू होऊनही भेटवस्तू दिल्याने त्यांच्यावर नियमभंगाचा आरोप होत आहे. यावर त्या काय स्पष्टीकरण देतात आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज निवडणुकांसंदर्भात घोषणा केली. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या वेळी जो एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी जारी केला होता. या नियमानुसार कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तास आधी मांडता येणार नाही. हा नियम विधानसभा निवडणुकीतही लागू होणार आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Visit :- policenama.com